
श्रीपूर दि 18 / 07 /2026
श्रीपूर वार्ता न्यूज संपादक शांतीलाल रेडे – पाटील
श्रीपूर, ता. माळशिरस : महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीने नुकतीच अतिक्रमणमुक्त केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील मोकळ्या जागेच्या सुशोभीकरणासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही माहिती महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे भाजप गटनेते राहुल (आप्पा) रेडे-पाटील यांनी दिली.
या निधीमुळे अतिक्रमण हटविल्यानंतर निर्माण झालेल्या मोकळ्या जागेचा नियोजनबद्ध विकास होणार असून परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच नागरिकांना आकर्षक व स्वच्छ सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे. रस्त्यालगत हरित पट्टा, आकर्षक पेव्हिंग, विद्युत रोषणाई, बसण्याची व्यवस्था आणि अन्य नागरी सुविधांचा समावेश असलेले सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राहुल रेडे-पाटील यांनी माळशिरसचे मा.आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या सहकार्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सुशोभीकरणासाठी निधीची मागणी करणारे निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तात्काळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत संबंधित अधिकाऱ्यांना सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याचे रेडे-पाटील यांनी सांगितले.
महाळुंग-श्रीपूर शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर रिकामी झालेल्या जागेचा लोकहितासाठी आणि शहराच्या सौंदर्यवृद्धीसाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. निधी मंजूर झाल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य दिले जाईल, निवेदन देताना नगरसेवक निनाद पटवर्धन, रावसाहेब सावंत,विक्रम लाटे आदि उपस्थित होते
सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना .
श्रीपूर येथील अतिक्रमणमुक्त झालेल्या जागेच्या सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी तात्काळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कामामुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल.
– राहुल (आप्पा) रेडे-पाटील
भाजप गटनेते, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत .
